मनोज जरांगेंची रुग्णालयातून मोठी घोषणा, पुढील आंदोलन आता मुंबईत... अंतरवाली सराटीतून एका रात्रीत उपोषणाचा मंडप हटवला...

Foto
छत्रपती संभाजीनगर : अंतरवली सराटी येथील मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणासाठी उभारण्यात आलेला मंडप अखेर रात्रीतून हटवण्यात आला आहे. यावर त्यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, आता भविष्यातील आंदोलन अंतरवाली सराटीत न होता, मुंबईत होईल. दरम्यान ग्रामस्थ आणि सरपंचांच्या निर्णयानंतर हा मंडप काढण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
 
प्राथमिक माहितीनुसार, गावचे सरपंच आणि मनोज जरांगे यांची जी कोर कमिटी आहे, त्यांच्यामध्ये संवाद झाला आणि काही ग्रामस्थांनीही त्याला प्रतिसाद देत हा मंडप रात्रीतून काढण्याचा निर्णय घेतला आहे. रात्रभरातून हा सगळा मंडप आणि मनोज जरांगे ज्या ठिकाणी उपोषणाला बसत होते, ते स्टेजदेखील काढण्यात आले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, २९ ऑगस्ट २०२३ रोजी मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी हे आंदोलन सुरू केले होते. या दरम्यानच्या काळात मनोज जरांगे यांनी अनेकदा उपोषण स्थगित केले, मात्र हे स्टेज किंवा मंडप कधीही काढण्यात आलेला नव्हता. परंतु, यावेळी तो काढण्यात आला आहे. 

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी केली जात आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषणाची घोषणा केली होती. काही आठवड्यापूर्वीच मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाला सुरुवात केली होती. त्यांनी आंतरवाली सराटीत उपोषण सुरू केलं होतं. त्यांनी अंतरवालीतून पुढे मुंबईत उपोषण करणार असल्याचे जाहीर केले होते. मुंंबईच्या उपोषणाला परवानगी नसतानाही मनोज जरांगे पाटील यांनी तिकडे जाणार असल्याचा निश्चय केला होता. परंतु सलग १८ दिवसांच्या उपोषणामुळे मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली होती. एकीकडे त्यांचा दौरा बीडच्या पाटोड्यात पोहोचला होता. परंतु तब्येत बिघडल्याने मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित केलं. सरकारच्या प्रतिनिधींच्या उपस्थित उपोषण मागे घेतलं.  आता मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले. आता पाटोड्यातून पुढे मुंबईत आंदोलन करणार असल्याची घोषणाच मनोज जरांगे यांनी केली.

मनोज जरांगे पाटील यांची उपोषणादरम्यान तब्येत बिघडल्यानंतर उपोषण स्थगित केलं होतं. फडणवीस सरकारमधील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत जरांगेंनी उपोषण सोडलं. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांना ९० दिवसांची मुदत सरकारला दिली होती. तर सरकारने देखील मनोज जरांगे पाटील यांच्या जवळपास अनेक मागण्या पूर्ण केल्याचा दावा केला होता. परंतु ओबीसीतून मराठा आरक्षणाची अंमलबजावणी व्यवस्थित होत नसल्याचा आरोप जरांगे यांनी केला होता. त्यामुळेच आंदोलनाचा नारा जरांगेंनी दिला होता. यावेळी त्यांनी जात पडताळणी समिती देखील रद्द करण्याची मागणी केली होती. परंतु सरकारमधील अनेकांनी या मागणीचा विरोध केला होता. त्यानंतरही मनोज जरांगे पाटील हे विविध मागणीसह ओबीसीतून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ठाम होते. त्यानंतर आज मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना मोठी घोषणा केली.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, आमची लढाई सुरू आहे. माझं शरीर उपोषणाचं राहिलं देखील नाही. रस्त्यावरील लढाई करतो. अंतरवाली आणि मराठा समीकरण कधीच सुटणार नाही. आता अंतरवालीत आंदोलन होणार नाही. तेथील आंदोलन स्थगित केलं. आमचं आंदोलन पोटोद्यापर्यंत गेलं आहे. अंतरवालीत आंदोलन होणार नाही. तेथील लोकांनी रक्त सांडलं. तेथील ओबीसी बांधवांनी वावर देखील दिले. मराठा समाज कधीच विसरणार नाही. तीन वर्ष झाले. पाटोद्यापर्यंत आंदोलन गेलं आहे. आता तीन महिन्याचा अवधी दिला आहे. तिथून पुढे मुंबई आंदोलन होईल.